गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

` १०० बिर्याणी'ज ! `

         समस्त खादाड टाळक्यांचे अस्सल मराठमोळ खाद्यतीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत'ल्या १०० बिर्याणी'ज नावाच्या खादयक्षेत्रात जायचा पूर्वनियोजित योग अखेरीस आज आला. दिवाळीच्या सुट्टी असूनही वेळेशी माझे चांगलेच बिनसले होते. सुट्टी डोळ्याची पापणी लवते न लवते तोच संपली !!! आणि या धामधुमीत आमचा बिर्याणी खादाडीचा प्लान फिस्कटला. सुट्टीनंतर सोमवार उजाडला. 'देवा रे सोमवार नको रे' ही म्हण आठवतच हाप्सात हजर झ्हालो. काहीही झ्हाले तरी बिर्याणी चापायचीच असा चंग बांधला होता. आज हाप्सातून सव्वा सातच्या आसपास घरी आलो. फ्रेश झ्हाल्यावर टी.वी वर राजकीय चर्चा - ' नवे भिडू, जुना सारीपाट- नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्र' पाहून मोकळा झ्हालो. आठच्या आसपास १०० बिर्याणी'ज कडे कूच केली.


            सातारा रस्त्यावर भारती विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोब्बर विरुद्ध दिशेस हे १०० बिर्याणी'ज हाटेल. बिर्याणी खायची तर चिकनच !! असा पावित्रा उचलूनच मी गेलो होतो आणि दोन बिर्याणी मारूनच आलो. नावाला साजेसे १०० बिर्याणी'जचा मेन्यूच आहे यांचा. ५० प्युअर व्हेज आणि ५० प्युअर नोन व्हेज. तसे फास्ट फूड, चायनीज, डेझर्ट ही इथे मिळते. इथला माहोल भिंतीवर लावलेल्या ऐतिहासिक पोस्टर्स मुळे इतिहासातील कालखंडाचा फील देत होता. मी अपेक्षाच केली न्हवती याची. आम्ही स्थानापन्न झ्हाल्यावर मेन्यू पूर्णत: न्हाहाळंला, चिकन बिर्याणी आणि सिख बिर्याणी ची ओर्डर वाढपी महाशयांकडे सुपूर्त केली. पोटातली कावळीही भूक्यावली होती. पंधरा मिनिटांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर बिर्याणीज आल्या एकदाच्या. अहाहा पुढला अर्धा तास मी आणि .....

          
           तुपातली बिर्याणी खाऊन दिलखुश झ्हाला. इथली आणाखी एक खासियत म्हणजे कोणतीही बिर्याणी सर्व केली जाते मातीच्या छोट्याश्या गाडग्यातून. त्यांच्या नावाच्या लोगोमद्धेही पहा हे स्पस्ष्ट दिसून येतेय. मनसोक्त जिभेचे चोचले भरून झ्हाल्यावर गरम गरम गुलाब जामून चा आस्वाद घेऊन आम्ही उठलो. इथले दर आणि दर्जा तुम्हा आम्हाला स्वीकारण्या जोगे आहेत. बिर्याणी हंटर्स साठी परफेक्ट ठिकाण !!

बिल पे करून १०० बिर्याणी'ज मधून बाहेर पडलो, पुढला बिर्याणी खादाडीचा संकल्प सोडनच !!!

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०१०

` डोक्यालिटी `

             सुट्यांचा मौसम होता. निरर्थक हॉलीवड्पट पाहण्यापेक्षा गाडीला किक मारून रायरेश्वर ला जाण्याचा चंग बांधला होता. मग काय ! मी आणि मयूर दोघेच यावेळी रायरेश्वर-केंजळगड जायचे ठरले. हा बेत ऐनवेळी म्हणजे जायच्या दिवशीच ठरला होता. शनिवारी सकाळी पोटोबाला खुश करून आम्ही भोर कडे कूच केली.नऊ वाजले निघता निघता. साधारण १०० मैलांचे अंतर कापायचे होते. जाताना खेड-शिवापूरला नेहमीप्रमाणे कैलासमध्ये मिसळ आणि मटकी भेळीवर ताव मारला. त्या दिवशीही अमाप गर्दी होती होट्लात.

      भोरला जाईस्तोवर मध्यान: व्हायला आली होती. भोरला आले की पहिला महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो. महाराजांना वंदन करून भोरमध्ये न थांबता आम्ही थेट कोरले-रायरेश्वर पायथ्याकडे निघालो. कोरले गावाच्या फाट्याला लागल्यावर वाहनांची गर्दी कमी होऊन रस्ता निर्मनुष्य दिसू लागला होता. रस्त्याच्या डावीकडे रोहीडा साद घालत होता. रायरेश्वर अजून नजरेत येत न्हवता. साधारण पाउण तासाभरात आम्ही गावाच्या अलीकडे पोहोचलो असेल. पुढचा रस्ता पार कच्चा होता. आणि न व्हायचे तेच झ्हाले !

            गावाच्या साधारण एक मैल आधी आमची फटफटी झ्हाली पंक्चर !! आता, भर दुपारच्या उन्हात आडगावात फटफटी पंक्चर म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच. आजूबाजूला कोणी दिसतही न्हवते. कोणाला विचारायचे म्हणजे गैरसोय. थोडे पुढे तशीच गाडी फरफटत(!) आणावी लागली. समोरून आजोबा येताना दिसले, जीवात जीव आला आमच्या. पण पुढच्याच क्षणी जीव पुन्हा जातोय का काय असे झ्हाले. आजोबा म्हंटले,'' काय र पोरहो, काय करताय इकड ?" मी," आजोबा, रायरेश्वर ट्रेक ला आलोय, पण गाडी पंक्चर झ्हालीये, रायरेश्वर किती लांब आहे अजून? " आजोबानी लगेच समोर हाताने रायरेश्वर कडे खुणावून दाखवत गावात पंक्चर काढण्याचे एकही दुकान नसल्याचे सागितले.


            आइ शप्पथ आता पुरती विल्हेवाट लागायाची पाळी आली. नशीब, रायरेश्वर पायथ्याला तरी पोहोचलो होतो आम्ही. डावीकडे केंजळगड तर उजवीकडे रायरेश्वर हाक देत होते पण काय करणार ? विचारातून बाहेर येत मी समोर पाहिले; आजोबा पुढे म्हणाले, पुढ गावात सायकल पंक्चर काढणारा एक इसम मिळेल, तुम्हाला काही मदत करू शकला तर पहा. अस म्हणून ते बाजूच्या वाटेने शिवारात निघून गेले. आमच्यासमोर दुसरा काही पर्याय न्हवता. पुन्हा त्याच कच्या वाटेने फटफटी ढकलत गावात आणली. सायकल पंक्चर काढायचे दुकान कुठे ? मयूरने गावात खेळणाऱ्या पोरांना दुरूनच विचारले. पडयालल्या लाइनतल्या कोपऱ्याचे पहिले घर, लगेच एका पोराचा रीप्लाय.



              आता पूर्ण मी घाम्याघुम होऊन त्या घरापाशी पोहोचलो. 'आहे का कोणी इथे? 'मयूर. आतून तिशी ओलांडलेले एक गृहस्थ आले. आम्ही,' पंक्चर कुठे काढून मिळेल ?' त्यांनी गाडी बाजूला लावायला सांगितली. पुढे जे काही होणार होते त्याची मी कल्पनाही केली न्हवती. पंक्चर काढणारे काका म्हणाले,' गावात गाडीचे पंक्चर काढायची व्यवस्था नाही'. आम्ही सायकल पंक्चर ला लागणारे हत्यारे ठेवतो. बोला काय करायचे ? पंक्चर काढा-आम्ही म्हणालो. विचार करा, त्यांच्याकडे हिटर, कॉम्प्रेसड एयर, स्पेशल ग्लू, रबर स्टिक ही बेसिक साधनसामुग्री नसताना त्यांनी आम्हाला पंक्चर काढून दिले.


               त्यांच्या कडची साधनसामुग्री होती, सायकल च्या चाकातली हवा भरायचा पंप, पाना, चिकटपट्टी सदृश स्टिकी गोल आणि पुरे पूर मदतीची इछा ! पंक्चर काढून झ्हाल्यावर काकांनी आम्हाला भोरला इथूनच परत जायचा सल्ला दिला. कारण एकतर गाडीचे हे शास्त्रशुद्ध पंक्चर काढलेले नाही हे त्यांनी मान्य केले होते, गाडी पुन्हा पंक्चर होऊ शकते. आणि दुसरे वर किल्यावर जाणारा रस्ता पारच खडकाळ आहे अस ते म्हणाले. इतक्या लांबून इतक्या जवळ येऊन आम्ही काही परतणार न्हवतो. काकांना थ्यांक्यू म्हणत गावातून आम्ही गाडीवर बसूनच सावकाश पुढे निघालो.


             गावातून वर म्हणजे गडावर जायला दोन रस्ते आहेत. दोन्ही पुरते खडकाळ. आम्ही वर जाताना रायरेश्वर कडच्या रस्त्याने वर आलो. आल्यावर गाडी पार्क करून रायरेश्वर शिडी मार्गाच्या पाशी पोहोचलो. दुपारचे तीन वाजले होते.फोटोगिरी सुसाट चालू होतीच. पूर्वी शिडी मार्ग न्हवता इथे. दगडाच्या खोबणीत हात-पायांची कसरत करत चढायला लागायचे. भोर आणि मुख्यत्वे रायरेश्वर ला इतिहासात फार मोलाचे स्थान आहे. भोर ऐतिहासिक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तर रायरेश्वरवर इथे शिवमंदिरात शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ आपल्या मावळ्यानबरोबर घेतली होती.

   
              आम्ही शिडीमार्गाने वर आल्यावर थेठ शिवमंदिरात गेलो. शिव शम्भुनसमोर नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण केले. रायरेश्वर किल्ल्यावर तुरळक लोकवस्ती आढळते. हे लोक शेती आणि गुरे पालनाचा व्यवसाय करतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे रायरेश्वर चे विस्तीर्ण पठारच आहे, सहा एक मैल त्याचा विस्तार असावा. किल्ला म्हंटला तरी तटबंदी आलीच. रायरेश्वर ला बुरुज किवा तटबंदी दिसत नाहीत. वर शाळाही आहे. इथे मंदिरात राहायची तर खालून गावातून खाण्याची व्यवस्था होऊ शकते. वर चिक्कार पाणी आहे. आणि हो, पांडवलेणी ही आहेत किल्ल्यावर. पावसाळ्यात हे पठार फुलांच्या गालिच्याने भरून जाते. इथून तोरणा, राजगड, रोहीडा, पुरंदर, वज्रगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड दृष्टीस पडतात. गोमुख तळे, अस्वलखिंड, भेक्राचा माळ ही आणखी काही किल्ल्यावरची पाहण्यासारखी ठिकाणे.


           शाळेबाहेरच्या कट्यावर आम्ही भेळ चापत निघायचं ठरवल. साडे चार वाजले होते. आम्ही केंजळगडाला वेळेअभावी जाऊ शकलो नाही. मात्र उतरताना केंजाळ गडाकडल्या रत्याने पुन्हा एकदा कोरले गावात आलो. आणि काय आश्चर्य पुन्हा एकदा आमची फटफटी पंक्चर ! यार अब तो हद हो गयी थी. पुन्हा पंक्चर वाल्या काकाकडे जाऊन पंक्चर काढावे लागले. यावेळी मागचे चाक पंक्चर होते. पण काही म्हणा ही जी काय गावरान डोक्यालिटी होती पंक्चर काढायची ती खरच अफलातून !!! नाहीतर आमच्या सारख्या भटक्यांचे काय झ्हाले असते कुणास ठाऊक ??? आता मात्र काकांना सलाम करत पुण्याचा रस्ता धरला.

            जाताजाता आम्ही आंबवडे ला जीवा महल समाधी पाशी गेलो.गावकऱ्यांनी स्वखर्चातून समाधी व्यवस्थित ठेवल्याचेपाहून उर भरून आला. समाधी समोर नतमस्तक होत मनातल्या मनात शूरवीर जीवा महालांचा प्रताप आठवत आम्ही निघालो. आंबवडेलाच स्थापत्यकलेचा नमुना असेलेला ब्रीटिशकालीन ससपेनशन ब्रिज ही पाहिला. सात वाजले होते संध्याकाळचे.


~ ~ ~ ~ ~ ~ दोन पंक्चर झ्हाले. पन्नास रुपये......ओ सायेब कसला विचार करताय ? अ...अ कसला नाही म्हणत पन्नासची नोट मी पंक्चर काढणाऱ्या पोराच्या हातावर थापत रायरेश्वर आठवणीतून बाहेर येत गाडीला किक मारली आणि घराकडे कूच केली..

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

` लिमिटेड माणुसकी `

          स्वातंत्र्य दिनी आम्ही शाळेत बऱ्याच वर्षांनी एकत्र आलो होतो. त्याच दिवशी दुपारनंतर मी आणि रोहितने पुण्यापासून साठेक कि.मी असलेल्या वज्रगड ट्रेकचा मनसुबा आखला होता. सकाळी अकराच्या आसपास आम्ही दुचाकीवरून नारायणपुराकडे कूच केली. जाताना अगदी बेफाम वेगात तासाभरात केतकावळीच्या जवळ असलेल्या छोट्याश्या पंचशील हॉटलाला धडक मारली. तिथे मिसळ चापून पुढचा रस्ता धरला. कालच पाउस पडून गेला होता, आज मस्त उन होते. घाटाच्या अलीकडे मनमुराद फोटोगिरी करायला दुचाकीवरून आम्ही उतरलो. काही वेळ फोटोगिरी करून पुन्हा पुढे निघालो.

         पाऊण तासात नारायाणपुरला आलो. समोर पुरंदर आणि वज्रगड ज्याला रुद्रमाळ असेही म्हणतात ते दिसत होते. सुट्टीचा दिवस होता, नारायाणपूर तुडुंब भरून वाहत होते. आम्ही गावातला रस्ता न धरता सरळ मुख्य रस्त्याला लागलो. पाहता पाहता दहा मिनिटात पुरंदरच्या मुरारबाजी देशपांडेच्या पुतळ्या पाशी येऊन पोहोचलो. सिंहगड पाठोपाठ पुरंदर सिमेंटाधीन झ्हाला हे माहीतच न्हवते मला.दोन वर्षापूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळी वर जायला पायवाट आणि कच्चा रस्ता होता. आता मात्र चांगला दोन चारचाकी वाहने जातील इतका मोठा डांबरी रस्ता पाहून उगीचच वाईट वाटले.

         वज्रगड किल्ला निम्याहून अधिक पुणेकरांना माहित नसल्याने आम्ही इकडे कमी जत्रा गृहीत धरली पण झ्हाले उलटेच. त्या दिवशी भयंकर वर्दळ होती. सासवड, पुणे, जेजुरी आणि आसपासच्या प्रदेशातली मंडळी दिसत होती. आता काय रस्ता झ्हालाय म्हंटल्यावर उठला की सुटला ! बाजीप्रभुना नमन करत डाव्या बाजूने आम्ही वज्रगडाकडे निघालो. पुरंदर आणि वज्रगड ही किल्यांची म्हंटल तर जोडगोळीच. त्यात पुरंदरला विशेष ऐतिहासिक महत्व. पुरंदरचा तह सर्वज्ञात . पण वज्रगड याचा इतिहासात पुरंदरच्या जवळचा किल्ला इतकाच उल्लेख. दुपारचे एक वाजून गेले होते.

         अनेक तरुण मुल - मुली, कुटुंबे याची गर्दी वाढत होती. मनाला पाहिजे तशी ही सर्वजण वागत होती. कोणी गाडी पार्क न करता सरळ निषिद्ध जागेत घुसवत होती. कोणी मनमुराद शिव्या एकमेकास देत होती. त्यांचाकडे कानाडोळा करत आम्ही आणखी अर्ध्या तासात वज्रगडाच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो. त्या काळ्या पाषाणात साकारलेल्या दरवाजापाशी पोहोचल्यावर हायसे वाटले. तिथेही काही टाळकी टिंग्या टवाळक्या करण्यात व्यस्त होती. थेठ वर आल्यावर पुरंदरचा पूर्ण किल्ला नजरेत भरतो.

          आणखी वज्रगडाच्या खालच्या बाजूस गेले की दोन बुरुज आणि तीन पाण्याची टाकी दिसतात. पहिल्या बुरुजावर पत्यांचे खेळ आणि कर्णकर्कश्श आवाजात देशभक्तीपर गीते ( १५ ऑगस्ट ) वजा अपभ्रंशीत करत बिनधास्त काही टाळकी पहाडली होती. दुसरा बुरुज बराच खाली असला कारणाने सुदैवाने तिकडे कोणी फिरकले न्हवते. इथेच वज्र हनुमानाचे आणि भगवान शंकरांचे मंदिर आहे.देवळात पाया पडून परत जायला निघालो. किल्यावर बाकी विशेष अवशेष दिसत नाहीत. मोठ्या खडकाचा बालेकिल्ला सदृशः असा भाग किल्ल्यावर भाग दिसतो. तिकडे काही टाळकी साहसी कृत्ते करण्यात मग्न होती. दूरवर नीरा नदीचे लांबच लांब पसरलेले पात्र दिसत होते. तो नजारा अप्रतिम होता.

          दुपारचे तीन वाजून गेले होते. रोहितला परत सात वाजता घरी पोहोचायचे होते. उतरून पुरंदरवर जायचे मनात न्हवते पण दीड तासाभरात पुरंदर भटकंती करून खाली नारायणपूर च्या दत्त मंदिरात पाचच्या आसपास पोहोचलो. दत्त माउलीस दंडवत घालून मनातल्यामनात सर्वांना सत्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करत पुण्याकडे प्रस्थान केले. अनेक विचारांनी माझा तरीही पाठ लाग सोडला न्हवता ...

असतो एकेकाला नाद सुट्टी मनसोक्त साजरा करण्याचा, म्हणून काय इथे कसेही उन्मत्त वागायचे;

असतो एकेकाला नाद इतिहासाचा, म्हणून काय इथे येऊन ऐतिहासिक वारस्याला नावे ठेवायची;

असतो एकेकाला नाद देशभक्तीपर गीते म्हणण्याचा, म्हणून काय इथे मोठमोठ्याने भ्रमणध्वनीवर गाणी लाऊन त्यांचा वाटेल तो अपभ्रंश करायचा;

असतो एकेकाला नाद साहसी कृत्ते करण्याचा, म्हणून काय इथे फाजील साहसी कृत्यांचा आखाडा भरवायाचा;

असतो एकेकाला नाद सिगरेट फुकायचा, ही काय जागा आहे हिरोगिरी दाखवायची;

असतो एकेकाला नाद मैत्रिणीबरोबर फिरायचा, म्हणून काय इथे काही माकड चाळे करायचे;

असतो एकेकाला नाद काहीतरी जगावेगळे करण्याचा, म्हणून काय नियम धाब्यावर ठेऊन त्याचीच आणून नाचक्की करायची.

... माणुसकी म्हणजे काय असते हो !

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

` ट्रेकिंगशी जुडले नाते ! `

             ट्रेकिंग म्हंटल की पहिल डोळ्यासमोर येतो 'सह्याद्री'. मानवजातीवर देवाने केलेले उपकार म्हणजे 'सह्याद्री'. ट्रेकर्सचा गुरु, दोस्त, वाटाड्या आणि कैक म्हणजे 'सह्याद्री'. सह्याद्रीतले ट्रेकिंग हा खरतर महाराष्ट्रातल्या बहुत माननीय व्यक्तींनी हाताळलेला विषय. तरीही माझे काही स्वैर, अल्प काही अलिखित आणि काही सर्वश्रुत फायदे प्रस्तुत लेखात मांडत आहे.
खरय, ट्रेकिंग म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम न्हवे तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे की जेणेकरून तुम्ही-आम्ही निसर्गाशी बिनधास्त एकरूप होतो. तुम्ही नियमित ट्रेक करता, याचा अर्थ तुम्ही जग अधिकाधिक सुंदर बनविण्याचा प्रयत्न करता.


#
वजनावर   ताबा ...                                                                                                                                            लठठपणा ही जाणकार डॉक्टरांच्या निकषानुसार एकदम सर्वत्र फैलावलेली तापदायक बाब आहे, जी दुर्दैवी गोष्ट आहे. भारतात सरासरी ४०% जादा वजन असलेला प्रौढ वर्ग आहे आणि १०% हून अधिक लठठपणाग्रस्त वर्ग आहे. आजच्या दैनंदिन जीवनात ज्याला बैठे काम आहे असा, बसून बराच वेळ घालवणारा, आंतरजालावर तासनतास घालवणारा, दुखी: सामान्य माणूस लठठपणा सारख्या व्याधीला बळी पडला जातोय हेच तथ्य. हे कुठेतरी कमी करायचे असेल तर उठा, ट्रेकिंगला निघा ! जाळून टाका शरीरातली अनावश्यक कैलरीज !

 #
हृदयरोग मुक्ती...
२५०० पेक्षाहून अधिक लोक दररोज हृदयविकाराने दगावतात. म्हणजे तुम्ही आत्ता हे वाचताय आणि १ व्यक्ती मरण पावतेय. सर्व पान वाचेपर्यंत पाच व्यक्ती मरण पावतील. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हृदय विकार आहे आणि तुम्ही नियमित ट्रेक करावा. नियमित ट्रेक जो पहिल्यापासून करतो त्याला हृदयविकार क्वचितच होतो.

 #
कोलेस्ट्रोल ताबा...
ट्रेकिंगमुळे एच.डी.एल ( हाय डेनसिटी लिपोप्रोटीन ) म्हणजेच उपयुक्त कोलेस्ट्रोल अपायकारक कोलेस्ट्रोलपासून मुक्त करायला मदत होते. मोबदल्यात हृदयविकाराची शक्यता आपोआप कमी होते.

 #
रक्तदाबावर ताबा...
साधारण तीस मिनिटाच्या छोट्या ट्रेकला जर तुम्ही रोज गेला तर मिळवले. जेणेकरून रक्तदाब कमी होऊन शरीराचा निरोगीपणा वाढण्यास मदत होते.

 #
औदासीन्य आणि तणाव मुक्ती...
शरीरातली नैसर्गिक रासायनिक द्रव्य एंडोर्फिन और एड्रेनालाईन सोडली जातात ज्यामुळे तणाव पातळीवर प्राकृतिक सकारात्मक प्रभाव पडण्यास मदत होते.

 #
दिर्घायुषी व्हा...
तुम्ही म्हातारे होत असला तर कमजोरी वाढत जाते, पण नियमित ट्रेकिंग मुळे कमजोरी कमी राहते. जसेजसे वय होते, तसेतसे तुम्हाला शारीरिक कमजोरी सहन करायची चिंता राहताच नाही.

 #
ऑस्टियोपोरोसिस रोख...
ट्रेकिंगमुळे हाडाचे घनत्व आणि ताकद वाढते. जेणेकरून कैल्शियम नुकसान कमी होते आणि हाडे अधिकाधिक दणकट होतात.

 #
स्वछछ हवा...
प्रदूषणापासून दूर मोकळ्या हवेत ट्रेक करून तर पहा, स्वर्गीय आनंद यापेक्षा काय असे म्हणाल !

 #
मधुमेह नियंत्रण...
ट्रेकिंगमुळे इंसुलिनच्या एकंदर संख्या मधुमेह प्रकार एक कमी करू शकतात.

 #
पाठीच्या यातनावर ताबा...
एकाच जागेवर कंप्यूटर बसून बसल्याने पाठीच्या दुखनीला बाले पडावे लागू शकते. जाणकार व्यक्तीच्या मते, चालण्यामुळे पाठीच्या यातना कमी होतात. म्हणूनच ट्रेकिंगमुळे शरीरावर एरोबिक्स किवा इतर व्यायामापेक्षा कमी ताण पडतो जेणेकरून मूळ शरीरातली शक्ती निर्माण व्हायला मदत होते.

 #
संपूर्ण शरीराचा व्यायाम...
ट्रेकिंगमुळे पायातले स्नायू, मुख्य शरीरातील स्नायू, फुप्फुस यांचा वापर होऊन पूर्ण शारीरिक धडधाकटपणा सुधारण्यास मदत होते.

 #
निसर्ग अनुभवा...
 ट्रेकर्स नैसर्गिक रचनांचा शोध लावण्यासाठी अज्ञात प्रदेशात प्रवास करतात जिथे फक्त पायच पोहोचू शकतात. व्यस्त शहरी जीवन आणि प्रदूषण यांना काही काळ दूर ठेवण्याचा यापेक्षा उत्तम पर्याय तो काय !

 #
आत्मविश्वास वृद्धी...
जसेजसे नवीनतम ट्रेक करत जाता तसेतसे तुम्हाला आत्मविश्वास येत जातो की चला आपण पुढल्यावेळी मोठा ट्रेक आखायचा. याचा परिणाम, कितीही वाईट हवामान परीस्थिती जरी आली तरी सामोरे जायला निर्भीड होता.

#
पाया बांधणी...
ट्रेकिंगमध्ये जर तुम्ही निष्णात झ्हालात तर क्षितीज आणखी विस्तारते. जसे की प्रस्तरारोहण, कातळारोहण, बाकपाकिंग, पर्वतारोहण आणि सलग्न इतर साहसी गतिविधि.

 #
विचार बदला जग बदलेल...
 ट्रेकिंग कम भटकंती तुम्ही वर्षभरातून केव्हाही करू शकता अगदी कोणत्याही ऋतूत. विश्वास नसेल तर एकच ट्रेक तुम्ही वर्षात वेगवेगळ्या ऋतूत करून पहा, मग तुम्हाला अनुभव येईल जग किती सुंदर आहे.

 #
उत्साहवर्धन आणि नियमित सुखी जीवन.....
प्राकृतिक वातावरणात ट्रेकिंगच्या निमित्ताने वेळ घालवल्यास मनोवैज्ञानिक प्रभाव सकारात्मक और मजबूत पडतो. हा अमूल्य वेळ तुम्हाला वास्तविक जीवन आणि कामाच्या ठिकाणी आणखी जोमाने काम करायला प्रवृत्त करतो.

###
चला तर मग छत्रपती शिवरायांचे स्मरण करून ट्रेकला निघुयात !!!


तळटीप -
संदर्भ : बेनिफिट्स ऑफ हायकिंग - शमीर ललानी  
छायाचित्र १ : गूगल साभार 

रविवार, १२ सप्टेंबर, २०१०

... तख्त ए हिंदुस्तान

            मागच्या महिन्यात दिल्लीला जाण्याचा योग आला. कामाच्या निमित्ताने प्रथमच दिल्लीला जाणार होतो, एका दिवसाचा बेत होता. मंगळवारी पाहाटेच किंगफीशरने लोहगावरून मला घेऊन थेट दिल्लीकडे झ्हेप घेतली होती. दोन तासात दिल्लीत इंदिरा गांधी विमानतळावर पोहोचलो. हवाइप्रवासात मजा (!) आली होती. पूर्ण प्रवास नयनरम्य (!) झ्हाला होता. पहिले लग्न कामाचे म्हणंत लगेच विमानतळाच्या बाहेर येत भिकाजी कामा प्यालेस ला जाणारी चारचाकी पकडली. इ आय एल च्या ऑफिस ला पोहोचलो. सेटल झ्हालो आणि आलेल्या कामाला लागलो. साधारण पाचच्या सुमारास काम आटपले. आमची परतीची फ्लाइट त्याच दिवशी रात्री नऊ वाजता होती. चार तास होतो. आज पहाटे तीन वाजता उठल्या पासून आतापर्यंत खूप रश झ्हाली होती. तरीही आलोय दिल्लीत तर लाल किल्ल्यावर जाऊनच येउयात असा विचार मनात आला. इ आय एल मधून व्यवस्थित काम आटोपून किल्ल्याकडे जाणारी रिक्षा धरली. पाऊन तासात तिथे येऊन धडकलो, एकशे दहा रुपये मोजून. जाताना दहा जनपथ वरून आम्ही गेलो. वाटेवरच बड्या राजकीय लोकांच्या निवासाची स्थाने दिसली जी आतापर्यंत न्यूज वाहिन्यांवर पाहत आलो होतो. इंडिया गेट, यु पी एस सी भवन, हाय कोर्ट, राष्ट्रापती भवन रिक्षातूनच पाहिली. वेळ कमी होता. लाल किल्ल्याच्या दिल्ली दरवाजापाशी आलो. वीस रुपये देऊन तिकीट काढले आणि आत शिरलो. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर आणखी एक भव्य दरवाजा दिसतो. त्याच्यावरचे नक्षी काम सुरेख होते.


           बरोबर दहा वर्षापूर्वी झ्हालेल्या भ्याड हल्ल्यामुळे किल्ला आता पोलीस तळ झ्हाला होता. शस्त्रधारी पोलीस किल्ल्याच्या अनेक ठिकाणी दिसत होते. आत किल्याचा विस्तार इतका मोठा आहे की त्या काळी ३००० लोक राहत असत. लाल किल्याशी भारताचा खूप मोठा इतिहास सलग्न आहे. आणखी पुढे गेल्यावर नगार खाण्याची देखणी इमारत लक्ष वेधून घेते. न्याशनल जीओग्राफिक वाहिनीचे काही विदेशी लोक तिकडे त्यांचा क्यामेरा लाऊन शूट करत होते. नगार खाण्यातून सरळ दिवान ए आम मधे आपण पोहोचतो. दिल्लीचे तख्त ते हेच ! कैक बादशहानी हे तख्त काबीज करायला अनेक चांगली आणि वाईट कामे केली याचा इतिहास साक्षीदार आहे. इथूनच बादशहा हुकुम जारी करायचे. सूनवाई इथूनच व्हायची. इथेच शिवाजी महाराजांनी सरेआम औरन्गजेबास ललकारले होते. तो झ्हारोखा आता बंद होता. माझी फोटोगिरी सुरु होती. सूर्यास्त होत आला होता. आम्ही अर्ध्या तासात दिवान ए खास, नहर ए बेह्शात, झ्हीनाना, हयात बक्ष बाग पाहून पुन्हा विमानतळाकडे निघालो. सात वाजले होते. विमानतळावर येईस्तोवर आठ वाजून गेले होते. चेक इन करेस्तोवर साडेआठ झ्हाले. एकदाचा विमानात बसलो. सकाळपासून सुरु झ्हालेल्या घोडदौडीला जरा विराम बसला. आम्ही सव्वा तास लाल किल्ल्यात असू. या सव्वा तासात संपूर्ण लाल किल्ला एक्स्प्लोर करता आला नसला तरी भारताचे ऐतिहासिक तख्त पाहिल्याचे सुख होते. क्यामेरात टिपलेले फोटो पाहण्यात मी मग्न झ्हालो आणि विमानाने पुण्याकडे प्रस्थान केले.

बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

` नागफणी वसुल ! `

            पुण्याच्या आसपास भटकंतीची अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे पुणेकर जसा वेळ मिळेल तसे हमखास जाऊन येतातच ! पण अशीही काही वसुल अनामिक ठिकाणेही आहेत जिथे किमान एकदा तरी जाऊनच यायला हवे ! खंडाळ्याच्या घाटातला 'ड्युक्स नोज' चा सरळसोट सुळका त्यापैकीच एक ! अगदी पुणे-मुंबई प्रवासात खंडाळा घाटातून जाताना डावीकडे कोकणात कोसळताना दिसणारा हा कातळ म्हणजे 'ड्युक्स नोज'. नाव जरा विचित्रच. विंग्रजी लोकांचा उपद्व्याप दुसरे काय ? नाहीतर हा सुळका 'नागफणी' नावाने सर्वश्रुत आहे. भीमाशंकराच्या इलाक्यातही 'नागफणी' आहे. नाव साधर्म्याने बर्याचदा गफलत होते माझी ! राजमाची वारीत नेहमी खुणावणारी नागफणी अखेर सर करून आल्यावर माझे गेल्या काही वर्षांचे अपूर्ण तप सफल झ्हाले होते. झ्हाले असे, पेपर वाचत एका रविवारी बसलो होतो. गिरीदर्शनचे ड्युक्स नोज चे निवेदन वाचले. तत्क्षणी ड्युक्स नोज चा बेत पक्का केला. नागफणी म्हंटले की जनता किती बेफाम होते ते त्यादिवशी समजले. रविवारी साधारण सात च्या आसपास टाळकी पुणे स्टेशन ला जमली होती. सकाळी सहाच्या सिंहगड एकसप्रेसने खंडाळ्याला जायचे होते. तिथून धबधब्याच्या रस्त्याने नागफणी. पाउस अजिबात न्हवता, तरीही वातावरण सुखद होते. रेलवेतच सर्वाकडून विकासने सेल्फ रिस्क एक्सेप्टन्स फॉर्म भरवून घेतला. रविवारचा दिवस, त्यात पावसाळा, जनता पुरेपूर उत्साहात होती. दोन तासातच गाडी खंडाळ्यात येऊन धडकली.


            खंडाळा पूर्ण धुक्यात गेलेले होते. आम्ही स्टेशन वर जरा सैरसपाटा मारला. स्टेशन वर काहीच गर्दी न्हवती. गिरीदर्शनचे सर्वेसर्वा सतीश मराठे नागफणी डोंगुर त्या दिवशीच्या नागफणी ट्रेक चे तिथेच ब्रीफिंग केले. नाश्ता, चहा आटोपून फोटोगीरीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर घोषणा देण्यात आली, "प्रौढ प्रताप पुरन्दर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनधिशवर छत्रपती शिवाजी महाराज की जय! " मागोमाग आम्ही आक्रमण !!!.... म्हणत नागफणी कडे कूच केली होती. नागफणी भटकंतीसाठी दोन पर्याय आहेत. पहिला सोइस्कर आणि सोपा मार्ग म्हणजे लोणावळ्याला यायचे, तिथून कुरुवांडे गावाला, पायी टाटा तलावाला वळसा घालून पोहोचायचे. रस्ता डांबरी आहे, चारचाकीनेही जाता येते. तिकडून अर्ध्या तासात नागफणी माथा ! काही भटके आला त्याच रस्त्याने उतरतात तर काही दुसऱ्या बाजूने खंडाळ्यात.


            पण जर तुम्हाला धबधबा वजा ट्रेक वजा नयनरम्य निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर दुसऱ्याशिवाय पर्याय नाही. त्याच वाटेवरून आम्ही गेलो. खंडाळा स्टेशनवरून मुंबईला जाणाऱ्या रेल रूट आम्ही धरला. पहिल्या बोगद्याच्या अलीकडे डावीकडे एक पायवाट लागते. तिथून वर गेले की मोहक बंगल्यांची रांग लागते. अजून जरा पुढे गेले की डावीकडे डोंगरात जाणारी पायवाट लागते. बास, तुम्ही बरोबर आलात ! गेल्या काही वर्षात नागफणी भटकंती करायला आलेले पण वाट चुकून जंगलात हरवलेले भटके आठवले की खूप वाईट वाटते. इतका आटापिटा करून ज्यासाठी आलो तो नागफणी चे दर्शन अजून काही होत न्हवते. सर्व टाळकी पुढे चालू लागली होती. हा परिसर मोसमात गर्द हिरवाइने वेढलेला होता. मस्त दाट जंगलच ! काही अंतरावरच धबधबा ! उजवीकडे दिसणारा खंडाळ्याचा विस्तृत परिसर !


            धुके, पाउस, उन यांचा लपंडाव पहात तासभर कसा गेला ते कळालेच नाही. पुन्हा एकदा दाट झ्हाडी, दहा मिनिटांच्या चढाइ नंतर छोट्या पठारावर येऊन पोहोचलो. डोळ्याचे पारणे फेडणारा समोरचा नजार पाहून मी थक्क झ्हालो होतो. समोर दूरवर नागफणीच्या सुळक्यावर उन्हाचा एक आकाशातून प्रकाशझोत पडला होता. बाकी आजूबाजूला धुके होते. आता नागफणी वर कधी एकदा पाय ठेवतोय असे झ्हाले होते. पुढे निघालो, पुन्हा पठार लागले पण विस्तीर्ण होते. इकडे आमच्या आधी येऊन ठेपलेल्या असंख्य भटक्यांची जमातच होती. व्ह्याली क्रोसिंग करून नागफणीवरून येथे उतरता येते एवढे विस्तृत पठार आहे. या पठारावरून समोर दूरवर प्रदेश दिसत होता. डावीकडे नागफणी आणि नागफणीला जोडूनच असलेले डचेस नोज साद घालत होते.


           मनमुराद फोटोगिरी करीत आणखी एक तास उलटला. माथ्यावर पोहोच्यान्यासाठी आता जरा कष्ट घ्यावे लागणार होते. पहिल्या दोन उभ्या दगडातल्या चढाइ नंतर डचेस नोज च्या माथ्यावर पोहोचलो होतो. डचेस नोज अगदी निमुळते ! त्याच्या टोकाला तर जेमतेम एक माणूस उभा राहील एवढीच जागा ! काही हौशी, धाडसी टाळकी तिथे फोटोगिरी करीत होती. नागफणी चा उभा कडा आता स्पष्ट दिसू लागला होता. दुपारचे दोन वाजून गेले होते. माथ्यावर जनता होती. पाउस शमला होता. धुकेही कमी झ्हाले होते. पाच मिनिटात नागफणी माथ्यावर पोहोचलो.


        
           ती जागाच अप्रतिम होती. प्रशस्त जागा होती. माथ्याच्या टोकाला अन्यथा कुठेही उभारून नजर टाकली की सृष्टीचे खुलून आलेले रेखीव निसर्ग चित्र दिसत होते.बेधुंद वारा आणि इवलेसे पाण्याचे थेंब हळूच मनतरंग उठवून पुढे सरकत होते. पूर्ण ३६० अंशात कुठे नजर पडली तरी तासंतास पाहवा असा देखावा तो ! माथ्यावर असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दोन्ही बाजूला कड्यावर पाय सोडून टाळकी बिनधास्त बसली होती. पायथ्या पासून सुमारे साडे आठशे फुट इतका उंच असलेल्या नागफणीवर आरोहक मंडळींचे अमाप प्रेम ! अनेकांनी त्याचा साधारण तीनशे फुटांचा कडा हातासरशी सरही केला आहे !



             सतीश मराठे आम्हाला राजमाची, कोरीगड, सुधागड, सरसगड, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, माणिकगड, माथेरान दुरूनच हाताने खुणावून दाखवत होते. फोटोगिरी थांबवून पोटोबाला खुश केले. परतीचे वेध लागले होते. पुन्हा एकदा माथ्यावर उगीचच रपेट मारून घेतली आणि परतीचा मार्ग धरला. आम्ही उतरताना कुरुवांडे गावातून उतरलो. तिकडून थेठ लोणावळा गाठले ! सर्व टाळकी येईस्तोवर जाता येणार न्हवते. डुलकी काढली काहीकाळ. आठच्या दरम्यानची लोकल पकडून दहापर्यंत घरी पोहोचलो होतो.

                                  आता नवे तप सुरु झ्हाले होते, ' नागफणी कातळारोहणाचे !' ...

छायाचित्रे : जी.टी.सी

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

` आमची शाळा !`


शाळा म्हटल की विद्यार्थी, शाळा म्हटल की शिक्षक,

शाळा म्हटल की वर्ग, शाळा म्हंटल की तास,

शाळा म्हंटल की अभ्यास, शाळा म्हंटल की परीक्षा,

शाळा म्हंटल की शिक्षा, शाळा म्हटलं की फजीती,

शाळा म्हंटल की क्रीडांगण, शाळा म्हंटल की खेळ,

शाळा म्हंटल की मजा, शाळा म्हंटल की रजा,

शाळा म्हटलं की दोस्ती, शाळा म्हंटल की मौजमस्ती,

शाळा म्हंटल की आठवणी, शाळा म्हंटल की आपुलकी,

शाळा म्हंटल की अमुल्य, शाळा म्हंटल की अभिमान,

शाळा म्हंटल की निरोप, शाळा म्हंटल की पुन्हा एकदा गाठी भेटी !!!




            १५ ऑगस्टचे औचित्य साधून कर्मवीरच्या माजी टाळक्यांनी भेटीचा बेत आखला. आंतरजालावरून टाळक्यांना दोन दिवस आधीच आमंत्रण पाठवले होते. तब्बल आठ वर्षांनी आंम्ही शाळेत भेटणार होतो. भलताच उत्साह संचारला होता.नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता झेंडावंदनाच्या ठीक पाच मिनिट आधी मी शाळेत हजर झ्हालो होतो. लांबच्या लांब अगणित टाळक्यांच्या नेटक्या रांगा मंचासमोर लागल्या होत्या.त्यांना आदरणीय गुरुजन मंडळी हटकत होते. एकसाथ सावधान सूचना ऐकताच मीही आपोआपच सावधान स्थितीत गेलो होतो.  विशाल आणि उपेंद्र मला सामील झ्हाले होते. राष्ट्रगीताला सुरुवात ज़्हाली, सर्वांनी झेंड्याला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. तोवर अनंत, रोहित, राहुल सामील झ्हाले होते. दर वर्षीप्रमाणे शाळेत व विद्यापीठात कार्यक्रम होतो. राष्ट्रगीत ज़्हाल्या वर प्राचार्यान्चे भाषण् झ्हाले. त्यानंतर सर्व टाळकी विद्यापीठातल्या होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी रवाना झ्हाली.आम्ही तिकडेच थांबून जुने दिवस आठवत होतो.दुरूनच वर्ग हेरत होतो. शाळेत असताना केलेल्या करामतीवरून हसत होतो.त्यात आमचे मास्तरही होतेच.हश्मी उशीरा सामील झ्हाला होता. काही वेळ फोटोगीरी गेली. क्षणभर आजची शाळांची परिस्थिती डोळ्यासमोर आली.आजकाल शाळा हा बराच मोठा बर्निग इशु झ्हाला आहे न्हवे राजकारणाचा विषय झ्हाला आहे.खरे पाहायला गेले तर असे म्हणता येईल की शाळा हे शैक्षणिक कारखाणे झ्हाले आहेत. आपल्या रोजमर्याच्या वस्तू उत्पादन करणारे स्वायत्त कारखाणे एका बाजूस आणि अमर्याद खर्च करवून उद्याचे नागरिक बनवणारे शैक्षणिक कारखाणे एका बाजूस. कितीही काही झ्हाले तरी शाळा ही प्राथमिक गरजे इतकीच महत्वाची असते हे काही वेगळे सांगायला नको. गप्पा इतक्या रंगल्या की दोन तास कधी उलटून गेले कळलेच नाही. जुन्या आठवणीतून बाहेर येत निघायची वेळ आली होती.पुन्हा इथच भेटायचा असा संकल्प सोडत घराचा रस्ता धरला.

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

` मुक्काम पोस्ट - मढेघाट ! `

          मढेघाटात भटकंतीचा बेत तसा अचानकच ठरला. मागल्या आठवड्यात रविवारी पावसाने उघडीक दिली होती. दोन दिवस बरसून आज मस्त उन पडले होते. दुचाकीवरून मढेघाटात भटकायचा करायचा विचार केला. आमच्या अभ्यासाला आज सुट्टी होती. मग काय ? दुचाकीवरून सकाळी आठ वाजता प्रस्थान केले नेहमीप्रमाणे मी, माझी फटफटी ! मढे घाटात जायचा किडा तसा खूप पूर्वीचा, आज तो शांत होणार होता. भरल्या पोटी घरातून निघालो, फटफटीचे चे पोटही जवळच कात्रज पेट्रोल पंपावर भरवले.

           पुण्यापासून साधारण पंच्याहत्तर कि.मी अंतरावर असलेल्या मढे घाटात खडकवासल्याहून जायला रस्ता आहे. निघालो त्यावेळी नेहमीप्रमाणे सिंहगडावर जाणाऱ्या जनतेची गर्दी सिंहगड रोडला होती. शहरापासून खानापुरात पोचोस्तोवर दहा वाजले होते. रस्ता मोकळा होता. माझ्या फटफटीने वेग धरला आणि पाबे घाटाचा रस्ता धरला. त्यानंतर अर्ध्या तासात पाबे खिंडीत पोचलो. समोर दूरवर राजगड आणि उजवीकडे तोरणा दिसला. धुक्यात हरवून गेलेले ! पाउस रिमझिम चालू होती. फोटोगिरी करून पाबे गाठले. छोटेसे गाव अगदी कोकणात आल्य्सारखे वाटते. तिथून वेल्ह्यात गेलो. वेल्ह्यापर्यंत रस्ता ठीकठाक होता.
          पुढे साधारण दोन तीन कि.मी रस्ता खराब होता. आता केळद पुढचा थांबा होता. एव्हाना पुन्हा एक छोटासा घाट लागला. पूर्ण धुके होते घाटात, मस्त ढगातून रायडींग केल्याचा अनुभव होता. वाटेत गुराखी भेटले, त्यांना केळदला जायचा रस्ता कन्फर्म करून पुढे निघालो. हा छोटा घाट संपल्यावर आणखी एक छोटा घाट लागतो आणि मग केळद गाव. केळद पर्यंत चारचाकी आरामात येते.
          मढे घाट पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सिमेवर आहे. घाटाला इतिहासात विशेष महत्व आहे. कोंढान्यावरच्या लढाइत अमर झ्हालेल्या सुभेदार तानाजी मालुसरे याचे पार्थिव याच घाटातून त्यांच्या जन्मगावी म्हणजे उमरठ ला नेण्यात आले होते. म्हणून हे नाव 'मढे'घाट. मढे घाट हा ट्रेक रूट नेहमीच भटक्याना साद घालत आलेला आहे. या वाटेने शिवथरघळ, वरंध, कावळा, रायगड ट्रेक करणारे भटके अमाप आहेत. इथली आणखी एक खासियत म्हणजे मनमोहक 'कारवी फुले' जी सात किंवा आठ वर्षातून एकदाच फुलतात ती मढे घाटात पाहायला मिळतात. समुद्रसपाटीपासून सतराशे फुटावरून कोसळणारा धबधबा ही मढे घाटाची शान !    
                      
          केळद वरून घाटात जायला पायपीट करावी लागते. हा दोन एक कि.मी चा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात तर लालेलाल चिखलाने भरून जातो. तशीच मी दुचाकी चिखलातून काढत पुढे घाटात येऊन धडकलो. बारा वाजायला आले होते. खाली कोकणात हाच कच्चा रस्ता जातो. तो वापरात नाही. इथून कोकणात महाडला रस्ता करण्यात येणार असल्याचे ऐकिवात आहे. घाटात धबधबा कोसळतो तिथे छोटेसे पठार आहे. तिथून दूरवर कोकण नजरेत भरतो. फोटोगीरीसाठी एकदम परफेक्ट जागा ! पुण्यातली जनता इथेही होती.   
          डावीकडे वरंध घाटात कोसळणारे धबधबे दुरून पांढरी रेषाच दिसत होते. धुक्याचा आणि पावसाचा पाठशिवणीचा खेळ पाहत तासंतास बसावेसे वाटले. क्यामेरयात ते क्षण साठवून परतीची वाट वाट धरली. येताना वेल्ह्यात जेवण केले. संध्याकाळ झाली होती पार घरी येईपर्यंत. केळद, मु.पो मढे घाट आपला पत्ता असावा क्षणभर वाटून गेले !!!

मंगळवार, २७ जुलै, २०१०

` भारत कधीकधी माझा देश आहे ! `

            कामाच्या व्यापातून बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाला होता. भटकंतीचा किडा वळवळायला लागला होता. एका दिवसाचा ट्रेकचा विचार होता. पण भटकायचे कुठे ?? मागच्याच आठवड्यात मल्हारगडाची मुसाफिरी करून आलो होतो. मेंदूवर जास्त दबाव न देता प्रतापगडावर जायचे पक्के केले. आकाश निरभ्र निळे होते. शनिवार होता त्या दिवशी. सकाळीच घरून निघालो. कात्रजवरून महाबळेश्वरला जाणारी एस.टी पकडली. कंडक्टरणे शंभराचे तिकीट फाडले थेट महाबळेश्वर. कालच पर्फोमन्स अप्रैजल भरून  साहेबाला एकदाचे देऊन टाकले होते त्यामुळे आज बराच रिलीफ वाटत होता. गाडीत मोकळी जागा अजिबात न्हवती. तसाच उभा राहून शिरवळ पर्यंत आलो. दरम्यान दोन माणसे माझ्या समोरील शीटवर मोठमोठ्याने बोलत होती. त्यांच्या चर्चेचा विषय होता नुकतीच मिरजेत झ्हालेली दंगल. राजकारणात मुरलेल्या एखाद्या नेत्याप्रमाणे त्यांची सविस्तर विवंचनात्मक चर्चेत मीही सहभागी झ्हालो काही काळ. शिरवळला बसायला जागा झ्हाली. मस्त तासाभराची डुलकी घेतली. जाग आली त्यावेळी गाडीने वाई ओलांडली होती.
          त्या दोन माणसांचे संभाषण अजून चालूच होते पण विषय बदलला होता. मुंबई हल्ल्याला जबाबदार कोण ? मी वेगळ्याच विचारात होतो. साधारण साडे नऊच्या दरम्यान गाडी महाबळेश्वरला धडकली. गाडीतून पाय खाली ठेवता क्षणीच एकच धांदल उडाली, ती म्हणजे तिथल्या लोकल गाईडची. सर्वजण एकदम अंगावर धाऊन आल्यासारखे जाहिरात करत होते. त्यांना हुलकावणी देऊन मी लगेचच कोकणात महाडला जाणारी एस.टी धरली. आंबनेळी घाटातून वीस मिनिटातच प्रतापगड पायथ्याला असलेल्या वाडा-कुंभरोशी नावाच्या छोट्याश्या गावात येऊन थांबली. आंबनेळी घाटातला रस्ता फारच वळणावळणाचा. वाडा हे छोटेसे गाव अगदी डोंगराच्या कुशीत लपलेले, झाडातून छुप्लेले. मी उतरलो. चहा घेतला. रस्त्यावर वाहतूक बरीच होती. गड महाबळेश्वरपासून जवळच असल्याने कदाचित.
           वाड्यातून रस्त्याला दोन फाटे फुटतात एक थेट गडावर जातो आणि दुसरा कोकणात. गडावर जाणारा रस्ता पकडून मी भराभर चालायला लागलो. पहिल्याच वळणावर पोलिसांची चौकी वजा तंबू दिसला. काही पोलीस दुचाकी आणि चारचाकी तपासत होते. मला काही समजले नाही, अश्या ठिकाणी तपासणी म्हणजे काहीतरी नक्कीच वावगे झ्हाले आहे असा प्रार्थमिक अंदाज बांधत मी पुढे निघालो. तीन वळणानंतर खालून मनोहारी प्रतापगडदर्शन झ्हाले. अफ़झल खानाला नेस्तनाबुत करणारया महाराजांच्या प्रतापाची साक्ष देणारा हा प्रतापगड. शिवरायांनी पूर्णपणे नवीन बांधलेला प्रतापगड हा पहिला किल्ला. गर्द झाडीतून जाणारा रस्ता, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या आणि दऱ्याखोऱ्यांचे अनोखे रूप हीच तर गडाची शोभा. क्यामेरयात ते क्षण कैद करून पुढे सरकलो. गडावर जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू होते. गडाच्या पायथ्याशीच एक छोटसे संग्रहालय आहे. तिथेच शिवसृष्टीतील शिल्पांसारख्या काही मूर्ती होत्या. थोडा वेळ तिथेच फोटोगिरी केली. दुपारचे बारा वाजून गेले होते. उन्हे डोक्यावर चढली होती.  
        पोटातली कावळी ओरडत होती. जरा पुढे गेल्यावर आणखी एक तम्बू कम चौकी आली.
मी आत डोकावून पाहतो न पाहतो तोच मागुन एक भारदस्त आवाज कानावर पडला. काय रे काय पाहिजे ? मी मागे बघितले तर साध्या वेशातले पोलिस काका त्यांच्या दुचाकीवर होते. मी काही बोलायच्या आतच त्यानी दुचाकीवर मागे बसण्याचा इशारा दिला. गडावर जायला मला चमत्काराने लिफ्ट तर मिलाली होती पण पोलिस काकांचा मुड औरच होता. त्यांचा भरमसाठ प्रश्नाचा मारा मला सहन करावा लागला. पासपोर्ट काढताना पण इतके प्रश्न विचारले न्ह्व्ते मला ! शेवटी मीच त्याना विचारले इतका बदोबस्त आज गडावर ? कोणी येणार आहे का ?
            त्याना मी महाराष्ट्रियन न्हवे भारतीय असल्याचे पटले असावे ! काही दिवसापूर्वी ज्हालेल्या मिरज दंगलीमूळ पूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्याच्याच पार्श्वभूमीवर घातपाताची अफवा गडाच्या परिसरात पसरली होती. त्यातच दोन दिवसांवर शिवप्रतापदिन येउन ठेपला होता. हे सर्व विचारात घेउनच गडाची सुरक्षा वाढवली होती. पोलिसकाका सांगत होते मी ऐकत होतो. मुम्बइ वर ज्हालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रसंग पुढे येऊ नये यासाठी सर्व. त्यांच्या प्रत्तेक प्रश्नाला काही वेळापूर्वी मला चिड आली होती. पण आता मला त्यांचा उगीचच अभिमान वाटत होता आणि स्व्ताहाचाही ! का कुणास ठाउक ? मी महाराष्ट्रियन न्हवे भारतीय आहे याचा मला अभिमान वाटत होता.
          आम्ही पुढच्या चौकिजवळ पोहोचलो होतो. अफ्जल खानाच्या शामियानाशेजारी. तिथे जायला परवानगी न्हवती. कारण तेच- मिरज दंगल प्रकरण. मी तिथेच उतरलो. पोलिसकाकाना धन्यवाद देऊन गडाकड़े कुच केली. पूर्वीच्या शामियान्याच्या इथे आता खानाची कब्र आहे.  गडाचा दरवाजा इथून दहां मिनिट. समोर अफजल बुरुज, उजवीकड़े रेडका बुरुज, डावीकडे सूर्य बुरुज, मागे जावळीचे जंगल - अहाहा डोळ्याचे पारणे फेडणारे ते दृश्य क्यामेरयात साठवत पुढे निघालो !!!



                          फिक्र ना कर ये शिवा का आखाडा है !
                     जिसने एक ही दम मे अफझल को उखाडा है !
                       जय भवानी ! जय श्रीराम ! जय शिवाजी !

 

           महादरवाज्यातून आत आल्यावर लगेच उजवीकडे लांबच लांब अफझल बुरुज आहे. खानाच्या वधानंतर त्याचे शीर या बुरुजावर ठेवण्यात आले होते म्हणून हे नाव. या बुरुजावरून समोर महाबळेश्वर आणि विस्तृत जावळीचे जंगल दृष्टीस पडते. खाली शामियाना म्हणजे आताची खानाची कबर इथून दिसते. बऱ्याच शाळांच्या शैक्षणिक सहली त्या दिवशी गडावर दिसल्या. मुले कौतुकाने त्यांच्या शिक्षकांकडून इतिहास समजावून घेत होती, बरे वाटले ! मधेच डोंगरयात्रा हातात घेऊन फिरणारी एक भटकी टोळीही भेटली मला, मुंबईहून आली होती. गडावर पर्यटक बरेच येत असल्याकारणाने खाण्यापिण्याची सोय आहे. वर कांही पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडे भवानीमातेचे मंदिर लागले. शेजारीच काही पुरातन तोफा, दारुगोळे, हत्यारे इ. ठेवलेल्या होत्या. मंदिरात भवानीमातेचे दर्शन घेऊन मी बालेकील्याजवळ निघालो.
            


        या शिवाजीराजांचे शौर्य आणि कर्तुत्व इतके मोठे आहे की,
       त्याची तुलना जगज्जेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल - गवर्नर गोवा १६६६

 

            दोन वाजले होते, पर्यटकांची गर्दी वाढतच होती. त्यात शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने गडावर रंग-रंगोटीच्या कामाला वेग आला होता. साफ सफाइ देखील चालू होती. उद्यापासून तीन दिवस म्हणजे शिवप्रतापदिन होईस्तोवर पर्यटनासाठी गड बंद राहणार होता. नशिबाने मी उद्या आलो नाही. बालेकिल्ला म्हणजे पूर्वी वाडा होता तिथे आता महाराजांचा अश्वारूढ देखणा पुतळा आहे. बाजूला छोटीशी बाग आहे. १९५७ साली भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या स्मारकाच्या उदघाटनाचा उल्लेख होता. 

     

  माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय  या भूमीवर आक्रमण करणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झ्हाला नाही  - शिव छत्रपतींचे मोगल अधिकाऱ्यास पत्र

         
          
त्यावेळी एक पारशी कुटुंब तिथे आले होते. हिंदीमध्ये महाराजांना एकेरी नावाने पुकारत त्यांच्या लहान मुलाला ते पुतळ्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगत होते. फोटो काढण्याचा हट्ट तो लहान मुलगा करीत होता. महारांजाचा पुतळा ज्या चौथर्यावर आहे तिथे स्पष्ट मराठीत लिहिले होते चौथर्यावर बसू नये. तरी देखील तो लहान मुलगा तिथे बसला आणि चक्क बसू नये यावर स्वताचा हात ठेऊन फोटो काढायचा दुरूनच इशारा त्याच्या बाबांना करू लागला. आता मात्र माझ्या सय्यमाचा  बांध फुटला. मी सरळ जाऊन त्या मुलाला पहिल्यांदा खाली उतरवले. तो मुलगा ओरडू लागला. आसपासचे लोक बघू लागले. मी सरळ त्यांना सांगितले इथे बसू नये लिहिले असताना तुम्ही बसून फोटो काढताय ? ते प्रकरण तिथेच संपले. कारण वाचता येत नसल्याने त्यांनी माफी मागून विषय मिटवला.  

           कडेलोट-दक्षिण-केदार-रेडका बुरुज पाहून मी जेवणासाठी एका हॉटेलात थांबलो. गडावर बरीच होटले आहेत. रेस्ट हौसही आहे. झुणका भाकर आणि थंडगार ताक घेऊन तृप्त झ्हालो. उतरतानाच समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीरायाला नमस्कार केला. डावीकडे छोटेसे नासके तळे दिसते. रेडक्या बुरुजावरून खाली कोकण दूरवर नजरेत भरतो. दुपारचे चार वाजले होते. परतीचे वेध लागले होते. शिवस्मरण करून गड उतरलो. वाड्यातून महाबळेश्वर गाठले. सहा वाजले होते. थंडी जाणवायला लागली होती. एस.टी ला वेळ होता, शेजारीच असलेल्या बाजारपेठेत रपेट मारली थोडा वेळ. साडेसहाला एस.टी धरून पुणे गाठले.
           नऊच्या आसपास घरी पोहोचलो त्यावेळी डोक जड झ्हाल्यासारखे वाटत होत. सकाळची एस.टी तली दोन माणस, वाड्यात भेटलेले पोलिसकाका, गडावर भेटलेल पारशी कुटुंब सारखी राहून राहून आठवतच होती !!!

सोमवार, ५ जुलै, २०१०

` शिखरवेध कळकराय ! `

          वर्षाअखेरीस रॉक ऑन ट्रेक टू ढाक बहिरी या मथळ्याखाली  गिरीदर्शन चे ई पत्र येऊन धडकले होते. नवीन वर्ष , नवी उमेद घेऊन ढाक बहिरी ला भ्रमंती करायचे ठरवले. दोन दिवसाचा हा ट्रेक फुलटू धमाल आहे असे बऱ्याच ठिकाणी वाचनात आले होते. मग काय शनिवारी दुपारी शिवाजीनगरहून रपेट सुरु झ्हाली. गिरीदर्शन आणि आम्ही साधारण ४० टाळकी असू. लोकल ने कामशेत गाठले त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजले होते. कामशेतहून जांभिवली असा पुढचा प्रवास होता. अर्धा तास वाट पाहूनही एस.टी आली नाही.मग तरकारी एक्ष्प्रेस्स म्हणजे जीप आपलीशी वाटू लागली. या तरकारी एक्ष्प्रेस्स मधून जांभिवली ला पोहोचलो. सात वाजले होते.सर्वांनी आपापली रात्रीची सेटल मेंट करयाला सुरुवात केली. गावातच शाळेच्या व्हरांड्यात आम्ही जागा धरून ठेवल्या, आणि इकडे तिकडे फिरू लागलो.थंडी हळूहळू जाणवायला लागली होती.

          रात्री नऊ वाजता शाळेमागील मोठ्या कट्ट्यावर एकत्र जेवणाचा आनंद लुटला. त्यानंतर कॅम्पफायर करण्यात आला. मध्य रात्री पर्यंत शेकोटी शेजारी बसून सर्वांनी आपले मन मोकळे होईस्तोवर गाणी गायली.सकाळी पाच वाजता उठून नाश्ता आटोपून ढाक स्वारी प्रारंभ झ्हाली ती गिरीदर्शनच्या घोषणेने. सर्व भलत्याच उल्हासात होतो. तासाभरात पहिल्या घाटमाथ्यावर येऊन पोहोचलो. गिरीदर्शनची नुकतीच पंधरा वर्षे पूर्ण झली होती त्याची अधिकृत घोषणा सतीश मराठे यांनी केली. त्यानंतर पुरषोत्तम ने येत्या काही महिन्यातच रौ ( रफ एंड वाइलड ) अंतर्गत होणारया कळकराय कातळारोहनचे ब्रीफिंग केले. काटाकीर्र  !!! त्याच वेळी कातळारोहनचा किडा डोक्यात गेला तो कळकराय शिखरवेध केल्यावरच शमला.         
          कळकराय ! नाव जरा विचित्रच नाही का ? याच श्रेणीतील अजून काही नावे जसे वानरलिंगी, नवरा-नवरी डोंगर, कात्राबाइ, आजोबा डोंगर, खुट्टा, तैलबैला, नागफणी, नानाचा अंगठा आणि कैक, भटक्यांच्या परिचयाची. कळकराय त्यापैकीच एक. माझे पहिलेच एक्सपीडीशन असल्याने उत्साह अमाप होता. पण ट्रेकिंग आणि कातळारोहनात बराच फरक. तो फरक विकास, अमित, पुरषोत्तम, अविंनव  यांच्या मार्गदशनाखाली, तळजाइच्या कपारीत सलग तीन आठवडे वीकेंडला केलेल्या रीयाजाने निघून गेला.
       
            फेबृअरी सहा, आम्ही दहा जनानी दुपारी शिवाजीनगरहून जाम्भीवलीला कूच केली. चार टाळकी आम्हाला रात्री जाम्भिव्लीत सामील झ्हाली. ट्रेकमेट आणि ट्रेकडी ची असंख्य टाळकीही ढाक सर करायला जाम्भिव्लीत दाखल झ्हाली त्याच दिवशी. आम्ही जेवण वगैरे आटपून आकराच्या सुमारास शाळेसमोरील ललिता जेडरल स्टोरचे मालक यांच्या घरात झ्होप्लो. आज नितांत आरामची गरज होती, उद्या बरीच उढाताण होणार होती. दुसर्या दिवशी सकाळी पाचला उठलो. पोहे चापले. मस्त चहा घेतला. क्ल्याम्बिंग गियर ज्यात हार्नेस, हेल्मेट, स्लिंग, क्यू.डी, डीसेनडर, पिटोन होते ते प्रत्येकाला देण्यात आले. त्यानंतर कळकराय पायथ्याकडे झ्हेप घेतली.  

            विकासने प्रथम कातळारोहणास सुरुवात केली. सागर ( निम - पासआउट ) याची त्याला साथ होती. आणि त्या दोघांची आम्हा सर्वांना साथ होती. हा सुळका दोन टप्यात सर करावा लागतो. पहिल्या टप्यात साधारण सत्तर फुटावर रोप फिक्स केल्यावर कातळारोहानास खरी सुरुवात झ्हाली.पहिल्याच टप्प्यात मेंदूवर आघात सुरु झ्हाले, हा प्याच खालून सोपा वाटत असला तरी पांच-दहा फुटावर पुन्हा हातात मुंग्या आणणारा होता. कारण वरती जाताना हाताने चाप्पून होल्ड मिळत होते. चपळ सारंगने काही मिनीटातच पहिला टप्पा सर केला. त्यानंतर मी ( दहा मिनिटे ! ) धापा टाकत पहिल्या रेस्ट पोईन्टला पोहोचलो, सेल्फ अंकर्ड. मागून अजून उरलेल्या टाळकयानी पहिला टप्पा सर केला. हा पहिला रेस्ट पोईन्ट म्हणजे एक अरुंद अशी त्या कातळावरची रेघच ! 'लक्ष्य' मध्ये शेवटी ह्रितिक रोषण आणि ग्यांग एका अरुंद रिज वर जाऊन बसतात, बास आगदी तशीच ! समोरच ढाकची लांबलचक आडवी भिंत डोळ्यात मावत न्हवती, क्यामेरात मावली ! त्या अजस्त्र भिंतीत श्री बहिरी देवाची गुहा पार खाली बारीकशी दिसत होत्ती.अनेक ट्रेकर्स दोस्त खालून आम्हाला निरखून पाहत होते. आम्ही साधारण तासभर तरी त्या रिज वर बसून होतो.

         दरम्यानच्या वेळात विकास, सागर आणि संग्रामने शिखरवेध केला होता. त्याची ग्वाही वरूनच आरोळी ठोकून आम्हाला दिली. आता विकास ने शिखरावर मेखा गाडून आणखी एका रोप सपोर्ट खाली सोडला आणि तो वरच थांबला होता. वेळ होती दुसरा टप्पा सर करण्याची. सागरने दुसर्या टप्प्यात सेल्फ अंकर्ड करून प्रत्येकाला अक्षरश: 'जिवंत' खेचले. हो 'जिवंत' हाच शब्द योग्य राहील. कारण हा टप्पा पार करण्यासाठी लागणारा मुव्ह हा इतका डोक्यात जाणारा होता की विचारूच नका. पहिल्यांदा फूट होल्ड, त्यानंतर फर्लांगभर उडी मारून दुसरा उजव्या हाताने धरायचा होल्ड, त्यानंतर डावा पाय वर घेऊन डावा व उजवा हातावर ( तो चार बोटे मावतील इतकाच ) धरायाचा होल्ड आणि शेवटी पूर्ण दगडाच्या मागे लपलेला होल्ड !! तुम्हाला खरे वाटणार नाही हे , पण इथून थेठ तीनशे फुटाची सरसकट दरी, एकजरी होल्ड सुटला की तुम्ही संपलाच. तो टप्पा पार करताना मला तेवीस वर्षाची माझी कहाणी फ्लाशबाक होईन दिसत होती !!! छत्तीस कोटी देव डोळ्यासमोर येऊन गेले होते. सागर या देवमाणसाने मला शेवटच्या मूव्ह ला खेचले आणि मी मोकळा श्वास घेतला.     

           आमच्यापैकी दोघांचा या दुसर्या टप्या वर फौल झ्हाला. सुदैवानं रोप सपोर्ट असल्याने त्यांना सुखरूप हा टप्पा पार करता आला. मी दुसर्या अरुंद रिजवर पोहोचलो होतो. पाण्याचा एक घोट घेतला. ही अरुंद रिज या कातळाचा उभा फेस असलेल्या बाजूला होती. खाली पुन्हा सरसकट तीनशे फुटाचा कातळ. समोर राजमाची आणि दूर ड्युक्स चा सुळका खुणावत होता. तो नजारा अवर्णनीय होता. अमितने लगेच शेवटचा साधारण तीसेक फुटाचा सोपा पण अंगात धडकी भरणारा टप्पा पार करायला सज्ज व्हायला सांगितले. मी सज्ज झ्हालो. रोप सपोर्ट वर आणि कपारीत होल्ड पकडून शेवटी मी शिखरवेध केले !!! मी कळकराय शिखरवेध केले !!! माझ्या आतापर्यंतच्या भटकन्तीला हा सर्वोच्च गर्वाचा दिवस होता.

           अविनव सर्वात शेवटी पूर्ण रोप वाएंड करून वर आला आणि आम्ही सर्वांनी एकच जल्लोष केला. शिखरावरून चोहोक्डचा प्रदेश दूरवर दिसत होता. मनमुराद फोटोगिरी केली. आता राप्लिंग करून उतरायचे होते. पुन्हा डोक्यात जाणारा तो कडा उतरून खाली जायचे होते. देवाचे नाव घेऊन मेखाला टाय केलेल्या रोपला हार्नेस फिक्स करून सुखरूप राप्लिंग करून खाली पोहोचलो अगदी दहा मिनिटात. बाकीची टाळकी राप्लिंग करून खाली उतरली.सर्व सहीसलामत खाली उतरलो होतो, आम्ही थकलो न्हवतो. वेगळाच आत्मविश्वास आला होता. आम्ही परतीची वाट धरली होती. दुरून कळकराय पुन्हा हाक घालत होता !!!
             
             
छायाचित्रे : जी.टी.सी

बुधवार, २३ जून, २०१०

` कावळ्यागड ` कधीतरी !

गुरुवार दुपार ~
रोहित : कसा आहेस ?
मी : फीट अन फाइन.
रोहित : ट्रेक ?
मी : विचार चालू आहे.    
रोहित : मी मोकळा आहे सध्या. जाऊ परवा. तोरणा ?
मी : उद्या कळवेन ...
शुक्रवार मध्यरात्र ~
रोहित : वरंध घाटाला धप्पा मारून येऊ.
मी : ठरल तर मग वरंध घाट-कावळ्यागड.


         वर्षभरानंतर पुन्हा वरंध्यातील कावळ्यागडाचा मी आणि रोहितने एका दिवसाचा मनसुबा आखला. 'भरल्या पोटी' निघायचे ठरले. रोहितच्या फटफटी 'प्या.प्रो' वरून जायचे होते. दहाच्या आसपास आम्ही निघालो आणि उनाड दिवसाची सुरुवात झ्हाली. आभाळ आले होते, पाउस न्हवता. हवेत गारवा होता. कालच बरसून गेलेल्या पावसाने हिरवळ उगीचच डोके वर काढू लागली होती. महा मार्गावरून फटफटीने वेग धरला, आमच्या पुढच्या ट्रेक च्या गप्पानीही वेग धरला ! एक का काय ! सगळा महाराष्ट्र ! एव्हाना आम्ही भोरला पोहोचलो होतो. अकरा वाजून गेले होते. भोर तालुक्याचे ठिकाण. वर्दळ कमीच तरीही. शिवाजी राजांचा अश्वारूढ पुतळा चौकात आजही दिमाखात उभा आहे. चौकातून डावीकडे रोहीद्याला वाट जाते आणि सरळ थेट वरंध्यात.  हॉटलात पोहे आणि वडा-पाव चापायला थांबलो. पोटाची खळगी भरली होती, आणि अंगात नवचैतन्य संचारले होते.


        बारा वाजले होते. गाडीने रस्ता धरला तसा डावीकडे रोहिडा खुणावू लागला आणि पुन्हा रोहितच्या रोहिड्याच्या पूर्वीच्या ट्रेकच्या आठवणीत गुंतलो. तिथे म्हणे भारतातील दुर्मिळ ओर्चीड चे आणि अशीच असंख्य जातीची फुले फुलून येतात. भारीच !! कॅमेरात दुरूनच रोहीद्याचे दोन बुरुज बंदिस्त करून पुढे निघालो. भोरपासून ते घाटापर्यंतचा प्रवास हा एक वेगळाच अनुभव ! डावीकडे दुरुच दूर सह्याद्री हात पसरून भटक्यांना जणू बोलावतोय. पुढे गेल्यावर नजरेत भरते रायरेश्वराचे विस्तृत पठार आणि नीरा देवधर धरण. मनमुराद फोटोगिरी चालूच होती. चौकटीबाहेरील जग छोट्याश्या चौकटीत बांधायचा माझा नेहमीचा प्रयत्न हा !!


         पुन्हा एकदा पुढचा रस्ता धरला. आता एकीकडे नीरा देवधर धरणाचे ब्याकवोटर आणि दुसरीकडे कोकणातील अगदी कोकणातील उतरत्या चापारांची घरे, वळणावळणाचा रस्ता आणि लाल माती , काय बोलणार तासंतास इथेच उभे राहावून डोळ्यात साठवून घ्यावेसे ते सजीव चित्रच !! साधारण दीड वाजता घाटाच्या खिंडीत पोहोचलो. एकीकडे देश आणि एकीकडे कोकण !!   
कोकणात दूरपर्यंत पावसाचे निशाण न्हवते , ढग उगीचच घिरट्या घालत होते.


        कावळ्यागड कुठे आहे भाऊ ?? - रोहित
       ५ कि.मी वाघजाइ कडून उजवी कडे - गावकरी
        धन्यवाद - रोहित            
  
       मागल्या वेळेस मी आलो होतो त्यावेळी मस्त धुके होते त्यामुळे रस्ता पुन्हा विचारून पुढे सरकलो. दोन वळणे घेतल्यावरच " जिब्राल्टर ऑफ इस्ट" नजरेत भरला. आणखी तीन वळणे घेतल्यावर वाघजाई. इथे बर्याच भजी पावाच्या टपर्या आहेत. वाघजाई संमोर खाली कोकणात कोसळणारे अनंत धबधबे पावसात येतात. पावसाळ्यातला स्वर्गच !!! इथून अर्ध्या तासाच्या अनतरावरच गड आहे. दोन भजी पाव बांधून घेतले, गाडी वाघजाइपाशी लावून गड गाठला.दुपारचे तीन वाजले होते.


        या गडाचा इतिहासात उल्लेख आढळत नाही. पण हा किल्ला घाटमाथ्यावर पहारा ठेवण्यासाठी आसावा. गडावरून चोफेर लांबपर्यंत प्रदेश दिसतो. गडावर एक छोटेखानी मंदिर आणि बैठकीचे अवशेष दिसतात. दुरून तोरणा, रायगड , वरंध घाट , कोकणातील गावे दृष्टीस येतात. गडावर पाण्याची टाकी नाहीत. पण वाघजाइच्या डोंगरावर सात छोटे तलाव आहेत. गडावरची  भ्रमंती संपवली आणि उतरणीचा मार्ग धरला. गड उतरल्यावर भजी पावाचा आस्वाद घेतला. वाघजाइला येऊन ताक मारले आणि पुण्याचा रस्ता धरला. घाटात येताना करवंदे खाऊन होती न्हवती तेवढी भूक भरवली आणि गाडीला शेवटची किक मारली.

 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.