सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

` लिमिटेड माणुसकी `

          स्वातंत्र्य दिनी आम्ही शाळेत बऱ्याच वर्षांनी एकत्र आलो होतो. त्याच दिवशी दुपारनंतर मी आणि रोहितने पुण्यापासून साठेक कि.मी असलेल्या वज्रगड ट्रेकचा मनसुबा आखला होता. सकाळी अकराच्या आसपास आम्ही दुचाकीवरून नारायणपुराकडे कूच केली. जाताना अगदी बेफाम वेगात तासाभरात केतकावळीच्या जवळ असलेल्या छोट्याश्या पंचशील हॉटलाला धडक मारली. तिथे मिसळ चापून पुढचा रस्ता धरला. कालच पाउस पडून गेला होता, आज मस्त उन होते. घाटाच्या अलीकडे मनमुराद फोटोगिरी करायला दुचाकीवरून आम्ही उतरलो. काही वेळ फोटोगिरी करून पुन्हा पुढे निघालो.

         पाऊण तासात नारायाणपुरला आलो. समोर पुरंदर आणि वज्रगड ज्याला रुद्रमाळ असेही म्हणतात ते दिसत होते. सुट्टीचा दिवस होता, नारायाणपूर तुडुंब भरून वाहत होते. आम्ही गावातला रस्ता न धरता सरळ मुख्य रस्त्याला लागलो. पाहता पाहता दहा मिनिटात पुरंदरच्या मुरारबाजी देशपांडेच्या पुतळ्या पाशी येऊन पोहोचलो. सिंहगड पाठोपाठ पुरंदर सिमेंटाधीन झ्हाला हे माहीतच न्हवते मला.दोन वर्षापूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळी वर जायला पायवाट आणि कच्चा रस्ता होता. आता मात्र चांगला दोन चारचाकी वाहने जातील इतका मोठा डांबरी रस्ता पाहून उगीचच वाईट वाटले.

         वज्रगड किल्ला निम्याहून अधिक पुणेकरांना माहित नसल्याने आम्ही इकडे कमी जत्रा गृहीत धरली पण झ्हाले उलटेच. त्या दिवशी भयंकर वर्दळ होती. सासवड, पुणे, जेजुरी आणि आसपासच्या प्रदेशातली मंडळी दिसत होती. आता काय रस्ता झ्हालाय म्हंटल्यावर उठला की सुटला ! बाजीप्रभुना नमन करत डाव्या बाजूने आम्ही वज्रगडाकडे निघालो. पुरंदर आणि वज्रगड ही किल्यांची म्हंटल तर जोडगोळीच. त्यात पुरंदरला विशेष ऐतिहासिक महत्व. पुरंदरचा तह सर्वज्ञात . पण वज्रगड याचा इतिहासात पुरंदरच्या जवळचा किल्ला इतकाच उल्लेख. दुपारचे एक वाजून गेले होते.

         अनेक तरुण मुल - मुली, कुटुंबे याची गर्दी वाढत होती. मनाला पाहिजे तशी ही सर्वजण वागत होती. कोणी गाडी पार्क न करता सरळ निषिद्ध जागेत घुसवत होती. कोणी मनमुराद शिव्या एकमेकास देत होती. त्यांचाकडे कानाडोळा करत आम्ही आणखी अर्ध्या तासात वज्रगडाच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो. त्या काळ्या पाषाणात साकारलेल्या दरवाजापाशी पोहोचल्यावर हायसे वाटले. तिथेही काही टाळकी टिंग्या टवाळक्या करण्यात व्यस्त होती. थेठ वर आल्यावर पुरंदरचा पूर्ण किल्ला नजरेत भरतो.

          आणखी वज्रगडाच्या खालच्या बाजूस गेले की दोन बुरुज आणि तीन पाण्याची टाकी दिसतात. पहिल्या बुरुजावर पत्यांचे खेळ आणि कर्णकर्कश्श आवाजात देशभक्तीपर गीते ( १५ ऑगस्ट ) वजा अपभ्रंशीत करत बिनधास्त काही टाळकी पहाडली होती. दुसरा बुरुज बराच खाली असला कारणाने सुदैवाने तिकडे कोणी फिरकले न्हवते. इथेच वज्र हनुमानाचे आणि भगवान शंकरांचे मंदिर आहे.देवळात पाया पडून परत जायला निघालो. किल्यावर बाकी विशेष अवशेष दिसत नाहीत. मोठ्या खडकाचा बालेकिल्ला सदृशः असा भाग किल्ल्यावर भाग दिसतो. तिकडे काही टाळकी साहसी कृत्ते करण्यात मग्न होती. दूरवर नीरा नदीचे लांबच लांब पसरलेले पात्र दिसत होते. तो नजारा अप्रतिम होता.

          दुपारचे तीन वाजून गेले होते. रोहितला परत सात वाजता घरी पोहोचायचे होते. उतरून पुरंदरवर जायचे मनात न्हवते पण दीड तासाभरात पुरंदर भटकंती करून खाली नारायणपूर च्या दत्त मंदिरात पाचच्या आसपास पोहोचलो. दत्त माउलीस दंडवत घालून मनातल्यामनात सर्वांना सत्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करत पुण्याकडे प्रस्थान केले. अनेक विचारांनी माझा तरीही पाठ लाग सोडला न्हवता ...

असतो एकेकाला नाद सुट्टी मनसोक्त साजरा करण्याचा, म्हणून काय इथे कसेही उन्मत्त वागायचे;

असतो एकेकाला नाद इतिहासाचा, म्हणून काय इथे येऊन ऐतिहासिक वारस्याला नावे ठेवायची;

असतो एकेकाला नाद देशभक्तीपर गीते म्हणण्याचा, म्हणून काय इथे मोठमोठ्याने भ्रमणध्वनीवर गाणी लाऊन त्यांचा वाटेल तो अपभ्रंश करायचा;

असतो एकेकाला नाद साहसी कृत्ते करण्याचा, म्हणून काय इथे फाजील साहसी कृत्यांचा आखाडा भरवायाचा;

असतो एकेकाला नाद सिगरेट फुकायचा, ही काय जागा आहे हिरोगिरी दाखवायची;

असतो एकेकाला नाद मैत्रिणीबरोबर फिरायचा, म्हणून काय इथे काही माकड चाळे करायचे;

असतो एकेकाला नाद काहीतरी जगावेगळे करण्याचा, म्हणून काय नियम धाब्यावर ठेऊन त्याचीच आणून नाचक्की करायची.

... माणुसकी म्हणजे काय असते हो !

 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.