सुट्यांचा मौसम होता. निरर्थक हॉलीवड्पट पाहण्यापेक्षा गाडीला किक मारून रायरेश्वर ला जाण्याचा चंग बांधला होता. मग काय ! मी आणि मयूर दोघेच यावेळी रायरेश्वर-केंजळगड जायचे ठरले. हा बेत ऐनवेळी म्हणजे जायच्या दिवशीच ठरला होता. शनिवारी सकाळी पोटोबाला खुश करून आम्ही भोर कडे कूच केली.नऊ वाजले निघता निघता. साधारण १०० मैलांचे अंतर कापायचे होते. जाताना खेड-शिवापूरला नेहमीप्रमाणे कैलासमध्ये मिसळ आणि मटकी भेळीवर ताव मारला. त्या दिवशीही अमाप गर्दी होती होट्लात.
भोरला जाईस्तोवर मध्यान: व्हायला आली होती. भोरला आले की पहिला महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो. महाराजांना वंदन करून भोरमध्ये न थांबता आम्ही थेट कोरले-रायरेश्वर पायथ्याकडे निघालो. कोरले गावाच्या फाट्याला लागल्यावर वाहनांची गर्दी कमी होऊन रस्ता निर्मनुष्य दिसू लागला होता. रस्त्याच्या डावीकडे रोहीडा साद घालत होता. रायरेश्वर अजून नजरेत येत न्हवता. साधारण पाउण तासाभरात आम्ही गावाच्या अलीकडे पोहोचलो असेल. पुढचा रस्ता पार कच्चा होता. आणि न व्हायचे तेच झ्हाले !
गावाच्या साधारण एक मैल आधी आमची फटफटी झ्हाली पंक्चर !! आता, भर दुपारच्या उन्हात आडगावात फटफटी पंक्चर म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच. आजूबाजूला कोणी दिसतही न्हवते. कोणाला विचारायचे म्हणजे गैरसोय. थोडे पुढे तशीच गाडी फरफटत(!) आणावी लागली. समोरून आजोबा येताना दिसले, जीवात जीव आला आमच्या. पण पुढच्याच क्षणी जीव पुन्हा जातोय का काय असे झ्हाले. आजोबा म्हंटले,'' काय र पोरहो, काय करताय इकड ?" मी," आजोबा, रायरेश्वर ट्रेक ला आलोय, पण गाडी पंक्चर झ्हालीये, रायरेश्वर किती लांब आहे अजून? " आजोबानी लगेच समोर हाताने रायरेश्वर कडे खुणावून दाखवत गावात पंक्चर काढण्याचे एकही दुकान नसल्याचे सागितले.
आइ शप्पथ आता पुरती विल्हेवाट लागायाची पाळी आली. नशीब, रायरेश्वर पायथ्याला तरी पोहोचलो होतो आम्ही. डावीकडे केंजळगड तर उजवीकडे रायरेश्वर हाक देत होते पण काय करणार ? विचारातून बाहेर येत मी समोर पाहिले; आजोबा पुढे म्हणाले, पुढ गावात सायकल पंक्चर काढणारा एक इसम मिळेल, तुम्हाला काही मदत करू शकला तर पहा. अस म्हणून ते बाजूच्या वाटेने शिवारात निघून गेले. आमच्यासमोर दुसरा काही पर्याय न्हवता. पुन्हा त्याच कच्या वाटेने फटफटी ढकलत गावात आणली. सायकल पंक्चर काढायचे दुकान कुठे ? मयूरने गावात खेळणाऱ्या पोरांना दुरूनच विचारले. पडयालल्या लाइनतल्या कोपऱ्याचे पहिले घर, लगेच एका पोराचा रीप्लाय.
आता पूर्ण मी घाम्याघुम होऊन त्या घरापाशी पोहोचलो. 'आहे का कोणी इथे? 'मयूर. आतून तिशी ओलांडलेले एक गृहस्थ आले. आम्ही,' पंक्चर कुठे काढून मिळेल ?' त्यांनी गाडी बाजूला लावायला सांगितली. पुढे जे काही होणार होते त्याची मी कल्पनाही केली न्हवती. पंक्चर काढणारे काका म्हणाले,' गावात गाडीचे पंक्चर काढायची व्यवस्था नाही'. आम्ही सायकल पंक्चर ला लागणारे हत्यारे ठेवतो. बोला काय करायचे ? पंक्चर काढा-आम्ही म्हणालो. विचार करा, त्यांच्याकडे हिटर, कॉम्प्रेसड एयर, स्पेशल ग्लू, रबर स्टिक ही बेसिक साधनसामुग्री नसताना त्यांनी आम्हाला पंक्चर काढून दिले.
त्यांच्या कडची साधनसामुग्री होती, सायकल च्या चाकातली हवा भरायचा पंप, पाना, चिकटपट्टी सदृश स्टिकी गोल आणि पुरे पूर मदतीची इछा ! पंक्चर काढून झ्हाल्यावर काकांनी आम्हाला भोरला इथूनच परत जायचा सल्ला दिला. कारण एकतर गाडीचे हे शास्त्रशुद्ध पंक्चर काढलेले नाही हे त्यांनी मान्य केले होते, गाडी पुन्हा पंक्चर होऊ शकते. आणि दुसरे वर किल्यावर जाणारा रस्ता पारच खडकाळ आहे अस ते म्हणाले. इतक्या लांबून इतक्या जवळ येऊन आम्ही काही परतणार न्हवतो. काकांना थ्यांक्यू म्हणत गावातून आम्ही गाडीवर बसूनच सावकाश पुढे निघालो.
आम्ही शिडीमार्गाने वर आल्यावर थेठ शिवमंदिरात गेलो. शिव शम्भुनसमोर नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण केले. रायरेश्वर किल्ल्यावर तुरळक लोकवस्ती आढळते. हे लोक शेती आणि गुरे पालनाचा व्यवसाय करतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे रायरेश्वर चे विस्तीर्ण पठारच आहे, सहा एक मैल त्याचा विस्तार असावा. किल्ला म्हंटला तरी तटबंदी आलीच. रायरेश्वर ला बुरुज किवा तटबंदी दिसत नाहीत. वर शाळाही आहे. इथे मंदिरात राहायची तर खालून गावातून खाण्याची व्यवस्था होऊ शकते. वर चिक्कार पाणी आहे. आणि हो, पांडवलेणी ही आहेत किल्ल्यावर. पावसाळ्यात हे पठार फुलांच्या गालिच्याने भरून जाते. इथून तोरणा, राजगड, रोहीडा, पुरंदर, वज्रगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड दृष्टीस पडतात. गोमुख तळे, अस्वलखिंड, भेक्राचा माळ ही आणखी काही किल्ल्यावरची पाहण्यासारखी ठिकाणे.
शाळेबाहेरच्या कट्यावर आम्ही भेळ चापत निघायचं ठरवल. साडे चार वाजले होते. आम्ही केंजळगडाला वेळेअभावी जाऊ शकलो नाही. मात्र उतरताना केंजाळ गडाकडल्या रत्याने पुन्हा एकदा कोरले गावात आलो. आणि काय आश्चर्य पुन्हा एकदा आमची फटफटी पंक्चर ! यार अब तो हद हो गयी थी. पुन्हा पंक्चर वाल्या काकाकडे जाऊन पंक्चर काढावे लागले. यावेळी मागचे चाक पंक्चर होते. पण काही म्हणा ही जी काय गावरान डोक्यालिटी होती पंक्चर काढायची ती खरच अफलातून !!! नाहीतर आमच्या सारख्या भटक्यांचे काय झ्हाले असते कुणास ठाऊक ??? आता मात्र काकांना सलाम करत पुण्याचा रस्ता धरला.
जाताजाता आम्ही आंबवडे ला जीवा महल समाधी पाशी गेलो.गावकऱ्यांनी स्वखर्चातून समाधी व्यवस्थित ठेवल्याचेपाहून उर भरून आला. समाधी समोर नतमस्तक होत मनातल्या मनात शूरवीर जीवा महालांचा प्रताप आठवत आम्ही निघालो. आंबवडेलाच स्थापत्यकलेचा नमुना असेलेला ब्रीटिशकालीन ससपेनशन ब्रिज ही पाहिला. सात वाजले होते संध्याकाळचे.
~ ~ ~ ~ ~ ~ दोन पंक्चर झ्हाले. पन्नास रुपये......ओ सायेब कसला विचार करताय ? अ...अ कसला नाही म्हणत पन्नासची नोट मी पंक्चर काढणाऱ्या पोराच्या हातावर थापत रायरेश्वर आठवणीतून बाहेर येत गाडीला किक मारली आणि घराकडे कूच केली..