शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

` मुक्काम पोस्ट - मढेघाट ! `

          मढेघाटात भटकंतीचा बेत तसा अचानकच ठरला. मागल्या आठवड्यात रविवारी पावसाने उघडीक दिली होती. दोन दिवस बरसून आज मस्त उन पडले होते. दुचाकीवरून मढेघाटात भटकायचा करायचा विचार केला. आमच्या अभ्यासाला आज सुट्टी होती. मग काय ? दुचाकीवरून सकाळी आठ वाजता प्रस्थान केले नेहमीप्रमाणे मी, माझी फटफटी ! मढे घाटात जायचा किडा तसा खूप पूर्वीचा, आज तो शांत होणार होता. भरल्या पोटी घरातून निघालो, फटफटीचे चे पोटही जवळच कात्रज पेट्रोल पंपावर भरवले.

           पुण्यापासून साधारण पंच्याहत्तर कि.मी अंतरावर असलेल्या मढे घाटात खडकवासल्याहून जायला रस्ता आहे. निघालो त्यावेळी नेहमीप्रमाणे सिंहगडावर जाणाऱ्या जनतेची गर्दी सिंहगड रोडला होती. शहरापासून खानापुरात पोचोस्तोवर दहा वाजले होते. रस्ता मोकळा होता. माझ्या फटफटीने वेग धरला आणि पाबे घाटाचा रस्ता धरला. त्यानंतर अर्ध्या तासात पाबे खिंडीत पोचलो. समोर दूरवर राजगड आणि उजवीकडे तोरणा दिसला. धुक्यात हरवून गेलेले ! पाउस रिमझिम चालू होती. फोटोगिरी करून पाबे गाठले. छोटेसे गाव अगदी कोकणात आल्य्सारखे वाटते. तिथून वेल्ह्यात गेलो. वेल्ह्यापर्यंत रस्ता ठीकठाक होता.
          पुढे साधारण दोन तीन कि.मी रस्ता खराब होता. आता केळद पुढचा थांबा होता. एव्हाना पुन्हा एक छोटासा घाट लागला. पूर्ण धुके होते घाटात, मस्त ढगातून रायडींग केल्याचा अनुभव होता. वाटेत गुराखी भेटले, त्यांना केळदला जायचा रस्ता कन्फर्म करून पुढे निघालो. हा छोटा घाट संपल्यावर आणखी एक छोटा घाट लागतो आणि मग केळद गाव. केळद पर्यंत चारचाकी आरामात येते.
          मढे घाट पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सिमेवर आहे. घाटाला इतिहासात विशेष महत्व आहे. कोंढान्यावरच्या लढाइत अमर झ्हालेल्या सुभेदार तानाजी मालुसरे याचे पार्थिव याच घाटातून त्यांच्या जन्मगावी म्हणजे उमरठ ला नेण्यात आले होते. म्हणून हे नाव 'मढे'घाट. मढे घाट हा ट्रेक रूट नेहमीच भटक्याना साद घालत आलेला आहे. या वाटेने शिवथरघळ, वरंध, कावळा, रायगड ट्रेक करणारे भटके अमाप आहेत. इथली आणखी एक खासियत म्हणजे मनमोहक 'कारवी फुले' जी सात किंवा आठ वर्षातून एकदाच फुलतात ती मढे घाटात पाहायला मिळतात. समुद्रसपाटीपासून सतराशे फुटावरून कोसळणारा धबधबा ही मढे घाटाची शान !    
                      
          केळद वरून घाटात जायला पायपीट करावी लागते. हा दोन एक कि.मी चा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात तर लालेलाल चिखलाने भरून जातो. तशीच मी दुचाकी चिखलातून काढत पुढे घाटात येऊन धडकलो. बारा वाजायला आले होते. खाली कोकणात हाच कच्चा रस्ता जातो. तो वापरात नाही. इथून कोकणात महाडला रस्ता करण्यात येणार असल्याचे ऐकिवात आहे. घाटात धबधबा कोसळतो तिथे छोटेसे पठार आहे. तिथून दूरवर कोकण नजरेत भरतो. फोटोगीरीसाठी एकदम परफेक्ट जागा ! पुण्यातली जनता इथेही होती.   
          डावीकडे वरंध घाटात कोसळणारे धबधबे दुरून पांढरी रेषाच दिसत होते. धुक्याचा आणि पावसाचा पाठशिवणीचा खेळ पाहत तासंतास बसावेसे वाटले. क्यामेरयात ते क्षण साठवून परतीची वाट वाट धरली. येताना वेल्ह्यात जेवण केले. संध्याकाळ झाली होती पार घरी येईपर्यंत. केळद, मु.पो मढे घाट आपला पत्ता असावा क्षणभर वाटून गेले !!!
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.